चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या १०० वर्षांपासून धुळ्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाखाली तसेच पाचोऱ्याकडे जाणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गाखाली अशा दोन ठिकाणी कमी उंचीचे भुयारी मार्ग अस्तित्वात आहेत. आज राज्य सरकारने अर्थसंकल्पात या दोन्ही भुयारी मार्गाच्या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात या भुयारी मार्गाचे बांधकाम सुरु होणार आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांनी आनंद व्यक्त केला आहे.
शहरातील रेल्वे रुळाखालून असलेल्या या मार्गांचे बांधकाम ब्रिटिशकालीन असून येथून सध्या फक्त रिक्षा, कार, मोटारसायकल, बैलगाडी व पादचारी यांनाच आवागमन करणे शक्य होते. मात्र तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी या अडचणीच्या पाठपुरावा करत या दोन्ही पूलांच्या भुयारी मार्गाचे बांधकाम तातडीने व्हावे, यासाठी रेल्वे विभागाकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आज राज्य सरकारने अर्थसंकल्पात या दोन्ही भुयारी मार्गाच्या कामासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या महिनाभरात या भुयारी मार्गाचे बांधकाम सुरु होणार आहे. पावसाळ्यात तसेच वर्षभर अडचणींचा सामना करणाऱ्या नागरिक व ग्रामीण भागातील ग्रामस्थांची या अडचणीतून सुटका होणार असल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.