बँकेत आलेल्या वृध्दाच्या पिशवीतून १ लाखाची रोकड लांबविली

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील अर्बन बँकेच्या काउंटरजवळ उभे असलेल्या ७० वर्षीय वृद्धाच्या पिशवीतून १ लाख रुपयांची रोकड अज्ञात दोन महिलांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आनंदा फकीरा गुजर वय- ७०, रा.जांभोरा ता. धरणगाव हे वृद्ध आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ते कामाच्यानिमित्ताने धरणगाव शहरातील अर्बन बँकेत आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील दीड लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांचा भरणा बँकेत केला व उर्वरित एक लाख रुपयांची रोकड त्यांनी पिशवीत ठेवली होती. त्यावेळी त्यांच्या मागे उभे असलेल्या दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीतून १ लाख रुपयांची रोकड काढून चोरी केली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर आनंदा गुजर यांनी तातडीने नजीकच्या धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

Protected Content