जळगावातील डॉक्टरची १ लाख १५ हजारांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील डॉ. के.डी.पाटील यांच्या हॉस्पिटलचे जुने लोखंडी भंगार विकत घेवून त्यांच्या मोबदल्यात १ लाख १५ हजार रूपये न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अखेर जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथे डॉ. के.डी.पाटील यांचे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुज पाटील यांनी १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ च्या दरम्यान त्यांच्याजवळील लोखंडी भंगार हे संदीप साहेबराव पाटील रा. रेणूका नगर, जळगाव यांना १ लाख १५ हजारात विक्री केले होते. तसेच त्याला हॉस्पिटलचे फेब्रीकेशनचे काम देखील दिले होते.

दरम्यान डॉ. पाटील यांनी विक्री केलेल्या भंगाराच्या मोबदल्यानंतर संदीप पाटील यांनी पैसे दिले नाही तसेच हॉस्पिटलचे फॅब्रिकेशनचे कामही केले नाही. दरम्यान संदर्भात डॉ. अनुज पाटील यांनी अखेर शनिवारी ४ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संदीप साहेबराव पाटील रा. रेणूका नगर, जळगाव याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र पाटील हे करीत आहे. .

Protected Content