जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ईश्वर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धाचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याची शिक्के आणि दागिने असा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर इब्राहिम बदामी (वय-७१, रा. ईश्वर कॉलनी, जळगाव) हे पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले असून, ते आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. सोमवारी, २१ जुलै रोजी दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातून सोन्याचे शिक्के, रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर शब्बीर बदामी यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे हे करत आहेत. या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.



