पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर मंजूर झालेले नैसर्गिक आपत्तीतील अनुदान परस्परपणे अन्य खात्यांमध्ये वळवून झालेल्या अफाट गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याविरोधात न्याय मिळावा यासाठी पत्रकार संदिप महाजन यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले.
तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या निधीपासून वंचित राहावे लागले. तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण यांनी संगनमताने बनावट लाभार्थ्यांच्या नावाने याद्या तयार केल्या. यामध्ये २०२२-२३ मध्ये १२२ तर २०२४-२५ मध्ये २२५ अशा एकूण ३४७ जणांच्या खात्यात शासनाच्या नावाने अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली, जी मूळ शेतकऱ्यांची नव्हती.

हे पैसे संबंधित खाती उघडून प्रथम जमा करण्यात आले आणि नंतर त्यातून पैसे काढले गेले. संबंधित खातेदारांशी संपर्क साधून त्यांच्याच खात्यांमधून रक्कम परत घेतल्याचे बोलले जात आहे. यामध्ये महसूल सहाय्यक, ई-सेवा केंद्र चालक आणि इतर काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या, तहसीलदार यांचे लॉगिन आयडी व पासवर्डचा गैरवापर करून संगणकीय प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आले.
या प्रकरणी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीदेखील कारवाई फक्त नोटीसा पाठवण्यापुरती मर्यादित राहिली होती. २०१९ पासून २०२५ पर्यंतच्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांना मंजूर झालेले अनुदान अद्याप अनेकांना मिळालेले नाही. उलट त्यांच्या नावावरचे पैसे दुसऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची तक्रारी वारंवार महसूल कार्यालयात करण्यात येत होत्या.
या सर्व प्रकाराचा निषेध करत, पत्रकार संदिप महाजन यांनी १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या मागण्या होत्या – दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन, आर्थिक गुन्हा शाखेच्या मार्फत चौकशी, चुकीच्या खात्यात गेलेली रक्कम मूळ शेतकऱ्यांना परत देणे आणि सन २०१९ पासूनच्या सर्व अनुदान याद्यांची गावनिहाय प्रत देणे.
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार उपस्थित होते. या आश्वासनानंतर संदिप महाजन यांनी आपले उपोषण मागे घेतले.



