४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्यांचे आजपासून कोरोना लसीकरण

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारत सरकारने सुरु केलेल्या कोरोना प्रतिब्ंधक लसीकरण मोहिमेचा आज चौथा टप्पा सुरु होत आहे. यामध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना  लस देण्यात येणार आहे.

 

 

आतापर्यंत केवळ कोरोनायोद्धे, सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील व्यक्ती आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना लस देण्यात येत होती. मात्र मध्यम वयातील बाधित व्यक्तींचं प्रमाण वाढत असल्याने त्यांचाही कोणत्याही अटी शर्थींशिवाय लसीकरण करण्यात येणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

 

. सरकारने एक जानेवारी २०२१ च्या आधारावर ही तारीख जाहीर केलीय. १ जानेवारी १९७७ ही कट ऑफ डेट म्हणून जाहीर करण्यात आली आहे.  एक जानेवारी १९७७ आधी जन्म झालेल्या सर्व व्यक्तींना या लसीकरण मोहिमेअंतर्गत लस घेता येईल.

 

लस घेण्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. कोविन पोर्टल किंवा आरोग्य सेतु अ‍ॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नाव नोंदणी करता येणार आहे. एखाद्या व्यक्तीला या पोर्टल किंवा अ‍ॅपवरुन नोंदणी करता आली नाही ती व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नाव नोंदणी करु शकते. लसीकरण केंद्रावरील नियोजित व्यक्तींचं लसीकरण झाल्यानंतर केंद्रावर जाऊन नोंदणी करणाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.

 

नोंदणी केल्यानंतरही लसीकरणासाठी जाताना ओळखपत्र न्यावं लागणार आहे.  आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स यासारख्या फोटो असणारी ओळखपत्र ग्राह्य धरली जातील.

 

एका मोबाइल क्रमांकावरुन चार जणांच्या लसीकरणासंदर्भातील नोंदणी करता येईल. नोंदणी करण्यासाठी सर्व माहिती भरुन ती सबमीट केल्यानंतर दिलेल्या क्रमांकावर एक एसएमएस येईल. नोंदणी पूर्ण केल्यानंतर जी माहिती देण्यात आली ती पडताळून पाहण्यासाठी आणि आवश्यक असल्यास बदल करण्यासाठी पर्याय दिला जाईल. त्यानंतर नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक नावाच्या पुढे अ‍ॅक्शन असा पर्याय दिसेल. त्याखाली कॅलेण्डरचा आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर हव्या त्या तारखेला लस घेण्यासाठी वेळ निवडता येईल.

 

सरकारी रुग्णालयामध्ये लसीकरण करुन घेतल्यास लसीकरण मोफत केलं जाईल. खासगी रुग्णालयामध्ये लसीकरण २५० रुपयांना केलं जाईल. यापैकी १५० रुपये लसीची किंमत आणि १०० रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल.

 

सध्या कोविशील्डच्या दोन डोसमध्ये चार ते सहा आठवड्यांचं अंतर ठेवण्यात आलं आहे. मात्र नव्या नियमांनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे पहिल्या डोस नंतर चार ते आठ आठवड्यांदरम्यान कधीही दुसरा डोस घेता येईल. कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस हा चार ते सहा आठवड्यांमध्ये देता येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Protected Content