नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्ली २५०० कोटी किंमतीची ३५० किलो हेरॉईन जप्त केली आहे. चार आरोपींनाही अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी तीन जणांना हरियाणा आणि एका आरोपीला दिल्लीहून अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आजवरच्या सर्वात मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफश केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत अडीच हजार कोटी असल्याचे म्हटले जाते. हे प्रकरण नार्को टेररिझमशी संबंधित असू शकते. त्या दृष्टीने तपास सुरु आहे. या सिंडिकेटचा पाकिस्तानशीही संबंध जोडला जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले की हे ऑपरेशन अनेक महिन्यांपासून सुरू आहे. एकूण ३५० किलो हेरॉईन जप्त करण्यात आली असून एका अफगाण नागरिकाला अटक केली आहे. कंटेनरमध्ये लपवून हेरॉईनचा माल समुद्रमार्गे मुंबईहून दिल्लीला आला. मध्य प्रदेशातील शिवपुरी जवळील कारखान्यात ड्रग्स अधिक दर्जेदार बनविली जात होती. त्यानंतर ड्रग्स पंजाबला पाठवले जात होते. तसेच फरीदाबादमध्ये ड्रग्स लपविण्यासाठी भाड्याचे घर घेतले गेले होते. अफगाणिस्तानात बसलेले आरोपी हे ऑपरेट करत होते.