जळगाव, प्रतिनिधी । एमएचटी-सीईटी अर्थात राज्य सामाईक प्रवेश परीक्षा, २०२० ही ऑनलाईन पध्दतीने १ ते ९ ऑक्टोबर, २०२० या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी (PCB) व १२ ते २० ऑक्टोंबर, २०२० या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स (PCM) ची परीक्षा जळगाव जिल्ह्यातील पाच परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे.
जिल्हयातील आयओएन डिजिटल झोन, आयडीझेड, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज कॅम्पस शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव, इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च, आयएमआर कॅम्पस, नॅ. हायवे 6, जळगाव, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव, जी.एच.रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग ॲड मॅनेजमेंट, शिरसोली रोड, मोहाडी, जळगाव आणि श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲड टेक्नोलॉजी झेडटीसी जवळ, भुसावळ जि. जळगाव या पाच उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच परीक्षेचे प्रथम सत्र सकाळी 7.30 ते दुपारी 12.00 व व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 याप्रमाणे राहील.
उमेदवारानी परीक्षेस येतांना परीक्षेसाठीचे ऑनलाईन मुळ प्रवेशपत्र व इतर मुळ ओळखपत्र (पॅनकार्ड/आधार कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना इत्यादी) सोबत आणावे. उमेदवारांनी पारदर्शक पाणी बॉटल, छोटी सॅनिटायझर बॉटल (50 ML), मास्क, काळा/निळा बॉलपेन ई. गोष्टी वगळता अन्य कोणत्याही वस्तू सोबत आणू नये. सकाळ सत्रासाठी उमेदवारांना सकाळी 7.30 ते 8.30 पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी 12.30 ते 2.00 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. सदर वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे.
या परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.