जळगाव प्रतिनिधी । समाजातील वंचित, गरजू आणि उपेक्षित वर्गासाठी कार्य करणार्या सामाजिक संस्था आणि सेवा महर्षींच्या कार्याची माहिती देणार्या मल्हार हेल्प-फेअरचे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान सागर पार्क येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मल्हार कम्युनिकेशनचे संचालक आनंद मल्हारा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लाइफ इज ब्यूटीफुल फाउंडेशन व मल्हार कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेल्प-फेअरच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्थांना मदत मिळाली आहे. यंदा याचे तिसरे वर्ष आहे. या हेल्प-फेअरमध्ये समाजोपयोगी कार्य करणार्या संस्थांची निवड प्रक्रियेद्वारे करून त्यांना या प्रदर्शनीत सहभागी केले जाते. या वर्षी होत असलेल्या हेल्प फेअर-३ मध्ये अनेक नव्या संकल्पनांचा समावेश असणार आहे. तसेच एखादी अनोखी, अभिनव, समाजोपयोगी संकल्पना ज्यांच्याकडे आहे, अशा व्यक्ती वा संस्थेला स्टार्ट-अप साठीसुद्धा यात सहभाग नोंदवता येणार असल्याची माहिती मल्हारा यांनी दिली. याप्रसंगी गनी मेनन, अमक कुकरेजा, चंदू नेवे, अद्वैत दंडवते, हर्षाली चौधरी, वंदना पवार उपस्थित होते.