१२२ राजकीय नेत्यांवर मनी लॉन्ड्रिंगचे खटले; ईडीची सुप्रीम कोर्टात यादी

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । देशात कुणाकुणावर मनी लॉन्ड्रिंगचे खटले सुरू आहेत याची १२२ राजकीय नेत्यांची नावे असलेली एक यादी ईडीने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

 

१२२ राजकारण्यांची नावे असलेल्या या यादीत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नावे आहेत. या यादीत अनेक राज्यांचे आजीमाजी मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांचीही नावे आहेत.

 

यादीत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची नावे आहेत. शिवाय भाजपच्याही नेत्यांची नावे आहेत. ईडीने सर्वोच्च न्यायालयाला ही यादी दिली आहे. मनी लॉन्ड्रिंगचे खटले सुरू असलेल्या नेत्यांच्या या यादीत ए. राजा आणि कनिमोझी यांची नावे सर्वात वर आहेत. 2010 मध्ये टू जी स्पेक्ट्रम घोटाळा उघड झाला होता. ए राजा आणि कनिमोझी यांच्यावर सीबीआयने आरोपपत्रं दाखल केलं होतं.  मनी लॉन्ड्रिंग उघड झालं होतं. त्यानंतर दोघांना या खटल्यातून मुक्त करण्यात आलं होतं. सीबीआयने दिल्ली कोर्टात अपील केलं होतं. त्यावरील निर्णय अजून प्रलंबित आहे.

 

या यादीत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ति चिदंबरम यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात 2012मधील एअरसेल मॅक्सिस व्यवहारप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2017मध्ये मीडियातील एफडीआयच्या मंजुरीप्रकरणी खटला दाखल करण्यात आला होता. या यादीत अनेक माजी मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. भाजपचे बीएस येडियुरप्पा, काँग्रेसचे बीएस हुड्डा, दिवंगत वीरभद्रा सिंह, ओइबोबी सिंह, गेगोंग अपांग, काँग्रेसचे नबाम तुकी, ओपी चौटाला (ट्रायल पूर्ण), एनसीपीचे चर्चिल अलेमाओ, काँग्रेसचे दिगंबर कामत आणि अशोक चव्हाण यांचाही समावेश आहे.

 

भाजपचे शुभेंदू अधिकारी, तृणमूलचे मुकुल रॉय, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, वाय. एस. जगनमोहन रेड्डी, अमरिंदर सिंह यांची नावेही या यादीत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि जगनमोहन रेड्डी या मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही यात समावेश आहे. यादीत झामुमोचे माजी आमदार सीता सोरेन, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, काँग्रेसचे डीके शिवकुमार, लालूप्रसाद यावद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव, तृणमूलचे मदन मित्रा, सुब्रत मुखर्जी, सोवन चटर्जी आणि श्यामपदा मुखर्जी यांचीही नावे आहेत.

 

Protected Content