रावेर प्रतिनिधी । शिक्षित होतकरू महिलांच्या कौशल्याचा विकास करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न भावी काळात करण्यात येणार असल्याचे आश्वासन आमदार शिरीष चौधरी यांनी येथील तहसील कार्यालयात आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत विधवा महिलांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरण करतांना दिले.

विधवा महिलांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरण
शासनाच्या महाराजस्व अभियानातर्गत तालुक्यातील ३७ विधवा महिलांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेशाचे आमदार चौधरी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते. या योजनेतून दिली जाणारी मदत ही तुटपुंजी आहे याची शासनाला जाणीव आहे. मात्र कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या महिलांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, बिडीओ दीपाली कोतवाल,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी जि.प. सदस्य रमेश पाटील, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार मनोज खारे, वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रभूचरण चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता इम्रान शेख, श्री तायडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता चोपडेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अव्वल कारकून विठोबा पाटील यांनी केले.


