मुंबई : वृत्तसंस्था । अँटिलियाजवळ स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. गाडीचे मालक मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याचं म्हटलं होतं. पण गाडी चोरीला गेली नाही, हिरेन यांनीच गाडीची चावी वाझे यांना दिली होती, असं तपासातून समोर आलं आहे.
हिरेन यांच्या हत्येमागील कारणांचा हळूहळू उलगडा होत असून, तपासातून नवी माहिती समोर आली आहे. “हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र, प्राथमिक दर्शनी असं दिसत की, हिरेन यांचा मृत्यू गळा दाबून नव्हे तर श्वास कोंडल्यानं झालेला आहे. त्यांच्या मृतदेहावर अशा कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालातून हे निश्चित होईल. जेव्हा मृतदेह त्यांचा मृतदेह वाहून आला, तेव्हा त्यांच्या तोंडातून अनेक हातरुमाल बाहेर काढण्यात आले होते, असं अधिकाऱ्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं.
स्फोटकांनी भरलेली गाडी आढळण्यापूर्वी हिरेन यांनी स्कॉर्पिओ गाडीची चावी वाझे यांना दिली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन कार चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी केली होती. दरम्यान, हिरेन यांच्या हत्येत सहभाग नसल्याचं वाझेंकडून सांगितलं जात असलं, तरी त्यांच्याविरुद्ध पुरावे आहेत, असंही सूत्रांनी सांगितलं.
“कॉल डेटा रेकॉर्ड, हत्येत सहभागी असलेल्या लोकांचं लोकशन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुराव्यातून वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या प्रकरणात सहभाग असल्याचंच दिसून येतं. मिठी नदीत मिळालेल्या ईलेक्ट्रॉनिक साधनांमधूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत,” असं सूत्रांनी सांगितलं.
वाझेंकडून हिरेन यांच्यावर गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी दबाब आणला जात होता. “ तपास एनआयएकडे सोपवण्यासाठी विरोधकांकडून सरकारवर दबाब होता. त्याच काळात हे प्रकरण एटीएसकडे जाणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. दुसरीकडे हिरेन प्रकरण स्वतःच्या नावावर घ्यायला तयार नव्हते. एनआयएकडे तपास जाण्याच्या भीतीने वाझे घाबरले होते. त्यातून त्यांनी हिरेन यांची हत्या केली. आता हिरेन यांची हत्या झाली, त्यावेळी वाझे तिथे होते का? याचा तपास केला जात आहे,” असं सूत्रांनी सांगितलं.