Home क्राईम हिमाचल प्रदेशातील हत्येप्रकरणातील फरार आरोपी जळगावात जेरबंद; शनिपेठ पोलिसांची मोठी कारवाई!

हिमाचल प्रदेशातील हत्येप्रकरणातील फरार आरोपी जळगावात जेरबंद; शनिपेठ पोलिसांची मोठी कारवाई!

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिमाचल प्रदेशात दारूच्या नशेत झालेल्या वादातून सहकाऱ्याची हत्या करून फरार झालेल्या चार अट्टल आरोपींना जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. हिमाचल पोलीस आणि जळगाव पोलिसांच्या संयुक्त व सतर्क कारवाईमुळे ही आंतरराज्यात पळालेली टोळी जळगावच्या शनिपेठ हद्दीत पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात मुकेश कुमार नावाच्या इसमाची दारू पिताना झालेल्या क्षुल्लक वादातून आरोपींनी भीषण हत्या केली होती. याप्रकरणी हिमाचल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह तलावात फेकून दिला व तेथून पसार झाले. तेथून किसनपूर, अंबाला आणि नंतर अमृतसर-मुंबई एक्सप्रेसने प्रवास करत असताना भुकेपोटी मोबाईल विकून पैसे मिळवण्यासाठी जळगाव स्थानकावर उतरले होते.

हिमाचल पोलिसांनी आरोपींचे लोकेशन जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे कळवल्यानंतर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तात्काळ तपास पथक रवाना केले. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून अवघ्या काही तासांत आरोपींचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये चंदन कुमार (वय २५, जि. मुझफ्फरपूर, बिहार), रोशन गोपीलाल मुखिया, संतोष कुमार आणि अजित कुमार यांचा समावेश आहे. या धडक कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोहेकॉ विजय खैर, योगेश जाधव, अनिल साळुंखे, पोकॉ निलेश घुगे, नवजीत चौधरी , अमोल वंजारी, पराग दुसाने, रवींद्र साबळे, आदी कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या कारवाईची माहिती हिमाचल प्रदेशच्या तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली असून पुढील कायदेशीर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound