हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील: सचिन सावंत

 

 

मुंबई:: वृत्तसंस्था । हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपच्याच अनेक नेत्यांची कोंडी होईल, अशी खोचक टिप्पणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला आघाडीने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी दिला होता.

त्यांच्या या टीकेला सचिन सावंत यांनी खोचक शैलीतील ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले. हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य या भाजपा महिला आघाडीच्या मागणीनंतर भाजपमधीलच काही नेते टेन्शनमध्ये आले असतील, असे सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता भाजपकडून सचिन सावंत यांना प्रत्युत्तर दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किरीट सोमय्यांचा अपवाद वगळता धनंजय मुंडे प्रकरणावर आतापर्यंत भाजपच्या एकाही बड्या नेत्याने भाष्य केलेले नाही. त्यामुळे या सगळ्यात भाजप एकूणच सावध भूमिका घेताना दिसत आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. पहिल्या बायकोपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास कायदेशीररित्या निवडणूक लढवण्यास मनाई असताना मुंडे यांना पाच मुले असल्याचं उघड झाल्याने त्यांची आमदारकीही धोक्यात आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

Protected Content