मुंबईः वृत्तसंस्था । बलरामपूर आणि हाथसरमध्ये घडलेल्या अत्याचारानी देश हादरला आहे. ‘महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केली तेव्हा संपूर्ण भाजप हिंदुत्वाच्या नावाने शंख फुंकत होता. मग हाथरस, बलरामपूर गुन्ह्यात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे. ‘
उत्तर प्रदेशात रामराज्यवगैरे नसून जंगलराज आहे. महिलांवर अत्याचार सुरूच आहेत, बलात्कार व खून करण्याच्या घटना योगींच्या राज्यात वाढल्या आहे.’ अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ संन्यासी आहेत. पंतप्रधान मोदी तर फकीर आहेत, मोदी यांना जागातील सर्वोच्च सुरक्षा आहे. योगी यांनांही मोठी सुरक्षा आहे. अखिलेश सरकारने एकदा योगींची सुरक्षा मागे घेतली होती. तेव्हा संसदेच्या सभागृहात याच योगी महाराजांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आज तेच योगी मुख्यमंत्री आहेत, पण अबलांना, मातांना सुरक्षा नाही,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘बलात्काराने विटंबना झालेले अबलांचे मृतदेह पोलीस पेट्रोल ओतून जाळत आहेत. हे कृत्य हिंदुत्वाच्या कोणत्या परंपरेत बसते? मृतदेहाची विटंबना करू नका, मृतदेहांना सन्मानाने अंत्यसंस्कार होण्याचा अधिकार आहे, पण मृतदेह पेट्रोल ओतून परंपरेशिवाय जाळले जात असतील तर ती हिंदू संस्कृतीची विटंबनाच आहे. अयोध्येतील सीतामाईही आज भयाने धरणीत गडप झाली असेल,’ अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे.
‘मुंबईत सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या की खून यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी वाहिन्यांवर चर्चा रंगवल्या. पण हाथरसच्या कन्येवर बलात्कार झालाच नाही यासाठी हे लोक वकिलीकौशल्य पणास लावत आहे. मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून कर्कश मीडियाचे अँकर्स आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत. देश इतका हतबल कधीच झाला नव्हता,’ असंही शिवसेनेने म्हटलं आहे.