नागपूर वृत्तसंस्था । हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती संबंधीत डॉक्टरांनी दिली आहे. आज या पीडितेवर एक अतिशय महत्वाची शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. मात्र, पीडितेच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने ऑक्सिजनची मात्रा वाढवण्यासाठी व्हेंटिलेटर लावण्यात आले असून शस्त्रक्रिया योग्य वेळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीडितेचा गुरुवारी रक्तदाब वाढला होता. त्यानंतर जंतूसंसर्गाचा धोका लक्षात घेता ऑरेंज सिटी रुग्णालयाने अतिदक्षता विभागातील सर्व ७ रुग्णांना इतरत्र हलविले होते. या ठिकाणी केवळ एकट्या पीडितेलाच ठेवण्यात आले आहे. हा वॉर्ड जळीत प्रकरणातील पिडीत तरुणीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यानंतर शुक्रवारी तिचा रक्तदाब स्थिर झाल्याने तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. या घडामोडीत भाजलेल्या तिच्या शरीरावरी जखमांचेही निर्जंतूकीकरण करण्यात आले. सोबतच या तरुणीच्या जखमांवरही ड्रेसिंग रोज बदलले जात आहे.
पिडीत तरुणीच्या शरिराचा ३५ टक्क्यांहून अधिक भाग भाजला आहे. तिच्या कमरेच्या वरील भाग आगीमुळे भाजल्याने श्वासनलिका, अन्ननलिका देखील भाजून निघाली आहे. त्यामुळे पीडितेला सध्या जंतूसंसर्गाचा मोठा धोका आहे. तिला हा संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण अतिदक्षता विभाग रिकामा करण्यात आला असून जंतूसंसर्ग तज्ज्ञ डॉ. अश्विनी तायडे, अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉ. राजेश अटल, बर्न स्पेशालिस्ट डॉ. अनिल केसवानी, डॉ. नुरूल अमिन तिच्या प्रकृतीवर बारिक लक्ष ठेवून आहेत.