वर्धा (वृत्तसंस्था) हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येत असून तिच्या मूळ गावात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी ‘रास्ता रोको’ सुरू केला आहे. यावेळी किरकोळ दगडफेक होत. पोलिसांना धक्काबुक्की झाल्याचेही वृत्त आहे.
सोमवारी सकाळी पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली होती. तसेच काहीजणांनी दगडफेकही केली. नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात कऱण्यात आला आहे. हिंगणघाट शहरातील संविधान चौकात नागरिकांनी फुलं वाहून पीडितेला श्रद्धांजली वाहिली. तसेच, पीडितेला न्याय द्या, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत नागरिकांनी रास्ता रोको केला. यावेळी नागरिकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली.