मुंबई : वृत्तसंस्था । हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळास करोना लस प्रकल्प सुरू करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. लस उत्पादनासाठी १५४ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत
केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने महामंडळाच्या परळ येथील जागेत हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. हैदराबाद या कंपनीकडून कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन तंत्रज्ञान घेण्यात आले असून लस उत्पादनासाठी १५४ कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यातील ९४ कोटी आकस्मिक निधीतून देण्यात येणार असून केंद्र सरकारही ६५ कोटी इतके अर्थसहाय्य देणार आहे.