जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पायी चालतांना मोबाईलवर बोलणाऱ्या नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून दुचाकीने पलायन करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील मोहाडी परिसरातील उमेश पार्क येथून गुरूवारी १८ मे रोजी दुपारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल हस्तगत केले आहे. राहुल देखनाळे रा.उमेश पार्क, मोहाडी परिसर, जळगाव असे अटक केलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे.
संशयित आरोपी राहुल देखनाळे याच्याकडे चोरीचे मोबाईल असुन ते मोबाईल तो विकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकातील पोलीस अंमलदार विजयसिंग धनसिंग पाटील, सुधाकर रामदास अंभोरे, जितेंद्र राजाराम पाटील, अकरम याकुब शेख, महेश आत्माराम महाजन, नितीन प्रकाश बाविस्कर, प्रीतम पिंतांबर पाटील, विजय शामराव पाटील, संदीप श्रावण सावळे, ईश्वर पंडीत पाटील, उमेशगिरी गोसावी आदींना तपासकामासह कारवाईकामी गुरूवारी १८ मे रोजी दुपारी रवाना केले.
गुप्त बातमीदाराकडून माग काढत तपास पथकाने संशयीत राहुल देखनाळे यास मोहाडी परिसरातील उमेश पार्क परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंगझडतीदरम्यान ओपो कंपनीचे दोन मोबाईल हस्तगत करण्यातआले. आपल्या साथीदाराच्या मदतीने धुम स्टाईल मोटार सायकलने दोन्ही मोबाईल जळगाव शहरातून पाच ते सात महिन्यापुर्वी पायी चालणा-या नागरिकांच्या हातातून हिसकावले असल्याचे त्याने कबुल केले. पुढील कारवाईकामी त्याला रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.