चंदीगड : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशनंतर आता हरियाणामध्ये देखील लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा निर्माण करण्याबाबत विचार सुरू आहे.
हरियाणचे गृहमंत्री अनिल विज यांनी स्वत: ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. फरीदाबादच्या वल्लभगड येथे झालेल्या निकिता तोमर हत्याकांडानंतर लव्ह जिहादचा मुद्दा देखील चांगलाच चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल विज यांनी ट्वटि करत, हरियाणामध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा निर्माण करण्यावर विचार सुरू आहे, असं सांगितलं आहे.
फरीदाबाद हत्याकांडाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याचा निर्णय हरियाणा सरकारने अगोदरच घेतलेला आहे. याबाबत देखील गृहमंत्री अनिल विज यांनी माहिती दिली आहे. आरोपींना लवकरच शिक्षा होईल, असं देखील त्यांनी ट्विट केलं होतं.
अनिल विज यांच्या मते वल्लभगड गुन्ह्याचा तपास एसआयटी आता २०१८ पासून करेल. जलद गती न्यायालयात दररोज सुनावणी केली जाईल. दोषींना दया माया दाखवली जाणार नसल्याचे हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील दिवसेंदिवस वाढत्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची अत्यंत गंभीरतेने दखल घेतल्याचे दिसून आले. अलहाबाद न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत, लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा तयार केला जाणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी भर सभेत सांगितले होते. महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल. असा गंभीर इशारा देखील त्यांनी यावेळी दिला होता.