नवी दिल्ली: वृत्तसंस्था । हरियाणातील भाजप सरकराला पाठिंबा देणाऱ्या जननायक जनता पार्टीच्या आमदारांची पक्ष सोडण्याची तयारी असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. जेजेपीमधील काही नेत्यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलं आहे. यामुळे जेजेपीचे काही आमदारांनी पक्षाची साथ सोडल्यास कोणत्याही क्षणी हरियाणा सरकार कोसळू शकते. हरियाणा विधानसभेत भाजप ४० जागावंर विजयी झाले आहेत तर जेजेपी १० जागांवर विजयी झाले. सध्या दोन्ही पक्षांचं सरकार सत्तेत आहे.
शेतकरी संघटनांच्या विरोधामुळे मनोहरलाल खट्टर यांची कर्नालमध्ये सभा होऊ शकली नव्हती. पक्षातून वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर दुष्यंत चौटालांनी मंगळवारी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अमित शाह यांची भेट घेतली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत मनोहरलाल खट्टर आणि दुष्यं चौटाला यांच्यामध्ये दीड तास बैठक चालली. याबैठकीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय, शेतकरी आंदोलन या विषयी चर्चा केली. मनोहरलाल खट्टर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करावं, असं आवाहन मनोहरलाल खट्टर यांनी केलं होते.
कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन यावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टानं ४ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये कृषी अर्थव्यवस्थेचे जाणकार आणि भारत सरकारचे माजी सल्लागार अशोक गुलाटी, भारतीय किसान यूनियनचे एचएस मान, प्रमोद कुमार जोशी आणि अनिल घनवट यांचा समावशे आहे.
भाजप: ४० , काँग्रेस : ३१ , जेजेपी : १० , भारतील राष्ट्रीय लोकदल : ०१ व इतर : ०८ असे हरियाणा विधानसभेतील पक्षीय संख्याबळ आहे .