पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी गुढीपाडव्याच्या सभेनंतर दुसऱ्या सभेत राज्य सरकारला ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. यामुळे एकीकडे आरोप-प्रत्यारोप होत असताना राज ठाकरेंच्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून त्यातच शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त पुण्यातील मारुती मंदिरात राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुढीपाडव्यानंतर झालेल्या सभेत मने अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हनुमान जयंतीला ते काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. त्यात पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती होणार असल्याचं पोस्टरदेखील लावण्यात आले आहे. त्यावरून महाआरती म्हणजे राज ठाकरेंच्या भोंग्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात असल्याचे दिसून येत आहे.
पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात राज ठाकरेंच्या हस्तेमहाआरती होणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठणासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी केली जात आहे. त्यामुळे मुंबई तसेच ठाण्यानंतर आता राज ठाकरेंनी आता त्यांचा मोर्चा पुण्याकडे वळवल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.