बुलढाणा – अमोल सराफ | सोयाबीन – कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानुसार शेकडो वाहने आणि हजारो शेतकऱ्यांची फौज घेऊन रविकांत तुपकर मुंबईकडे रवाना झाले आहेत.
स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरसमोरुन आज २३ नोव्हेंबर रोजी ही यात्रा मार्गस्थ झाली. आता माघार नाही, शेतकऱ्यांच्या हक्काचा हा लढा आहे. सरकारचे आमचे मुडदेच पहायचे असतील तर आम्ही शहीद व्हायला तयार आहे, पोलिसांनी अडवा-अडवी केल्यास रक्ताचे पाट वाहतील, असा गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव स्थीर रहावा यासाठी सोयापेंड (डीओसी) नियार्तीला प्रोत्साहन द्यावे, सोयापेंड आयात करु नये, यासह इतर मागण्यांसाठी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारले आहे. ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात रेकॉर्ड ब्रेक मोर्चा निघाला होता, हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आपला रोष व्यक्त केला. परंतु, या मोर्चानंतरही शासनाने ठोस भूमिका न घेतल्याने रविकांत तुपकर यांनी थेट मुंबई येथे अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा गंभीर इशारा दिला आहे. दरम्यान या संदर्भात पोलिसांनी यापूर्वीच तुपकरांना नोटीस बजावली होती. परंतु, अशा कितीही नोटीस आल्या तरी थांबणार नाही, असे तुपकरांनी सांगितले होते. आज बुधवार दि. २३ नोव्हेंबरला सकाळी सात वाजेपासूनच शेतकऱ्यांची वाहने बुलढाण्यात दाखल होण्यास सुरुवात झाली. स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर समोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागला, शेतकऱ्यांची गर्दी झाली. सुमारे दोनशे वाहनांचा ताफा, हजारो शेतकरी जमा झाल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक वळवावी लागली. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आम्ही सरकारला जागे करायला निघालो आहे. वास्तविक अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न यापूर्वी कुणीच केला नाही. परंतु, सरकार शेतकऱ्यांचा आवाह ऐकायला तयारच नसल्याने आम्हाला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. आता माघार नाही, २४ नोव्हेंबर रोजी मंत्रालया शेजारी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवरुन अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलन करणारच असे रविकांत तुकपरांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या भावना आक्रमक आहेत, युवक, ज्येष्ठ, वृद्ध तसेच महिला देखील मुंबईकडे निघाल्या आहेत. पोलिसांनी अडवा – अडवी केल्यास रक्ताचे पाट वाहतील, असा गंभीर इशारा तुपकरांनी दिला आहे. शेतकरी एकजुटीचा बुलंद नारा देत रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे रवाना झाली.
शेतकऱ्यांसाठी शहीद होण्यास तयार
शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन आम्ही निघालो आहेत.आम्ही विराट असा मोर्चा काढला, निवेदने दिली परंतु त्याउपरही सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार लक्ष देणार नसेल तर आता आम्ही जलसमाधीची तयारी केली आहे. आमचे प्रेतच सरकारला पहायचे असतील तर रविकांत तुपकर शेतकऱ्यांसाठी शहीद होण्यास तयार आहे, अशी ठाम भूमिका तुपकरांनी व्यक्त केली आहे.
कार्यकर्त्यांचा उत्साह
आपापल्या भाकरी बांधून शेतकरी वेगवेगळ्या वाहनातूना बुलढाण्यात सकाळपासूनच दाखल होत होते. दफड्यांच्या निनादात आणि प्रचंड घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मुंबईकडे रवाना होण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. बळीराजाच्या लढाईसाठी स्वयंस्फूर्तीने आणि उत्साहाने ही फौज रवाना झाली.