पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जारगांव चौफुलीवरील एका स्पेअरपार्ट दुकानाचे शटर वाकवुन दुकानात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेले १ लाख १५ हजार रुपये चोरुन नेल्याने घटना शुक्रवारी १६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील जारगांव चौफुलीवर मुबारक जहांगीर देशमुख रा. प्लाॅट नं. १६८, अक्सा नगर, पाचोरा यांचे सोनी अॅटोमोबाईल नावाचे चारचाकीसाठी लागणाऱ्या स्पेअरपार्टचे दुकान आहे. नित्य नियमाप्रमाणे मुबारक देशमुख यांनी दि. १५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन ते व दुकानात काम करणारे कामगार घरी निघुन गेले. दरम्यान आज दि. १६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मुबारक देशमुख यांना बाळु गोसावी यांनी फोन करुन सांगितले की, तुमच्या दुकानाचे शटर वाकवलेल्या स्थितीत दिसुन येत आहे. असे कळताच मुबारक देशमुख हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व दुकानात प्रवेश करुन बघितले असता गल्ल्यात ठेवलेले १ लाख १० हजार रुपये (१००, २०० व ५०० रुपयांच्या नोटा) तसेच ५ हजार रुपये (५, १०, २० रुपयांचे नाणे व नोटा) आढळुन आले नसल्याने मुबारक देशमुख यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन दुकानात लावण्यात आलेले सी. सी. टी. व्ही. फुटेज चेक केले असता फुटेज मध्ये चोरट्यांचे चेहरे दिसत नसुन पोलिसांपुढे चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. मात्र तीन चोरटे असल्याचे फुटेजमधुन निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.