जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या सुरक्षिततेसाठी हँड सॅनिटायझर वापराने गरजेचे झाले आहे. सॅनिटायझरची निर्मिती औषधी आणि सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक अशा तीन वेगवेगळ्या कायद्याखाली होत असते. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकानदारांनी सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक वर्गात मोडणाऱ्या सॅनिटायझरचीच विक्री करावी, अशा सूचना अन्न व औषध निरीक्षकांनी दिल्या आहेत.
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अन्न व औषध निरीक्षक एम.एन.अय्या व एम.बी.कवटीवाल यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललीत बरडीया, उपाध्यक्ष अनिल कांकरिया, नितीन रेदासनी, सुनील कांकरिया, कमलेश कांकरिया हे उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर वापराचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. सॅनिटायझरची विक्री औषधी दुकानांसह किराणा दुकानात देखील होत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी सॅनिटायझर विक्रीबाबत काही निर्देश दिले असून त्यानुसार किराणा दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांनी कोणते सॅनिटायझर विक्री करावे हे निश्चित करण्यात आले आहे. अलोपॅथी औषधी कायद्यान्वये निर्मिती करण्यात आलेले कोणतेही सॅनिटायझर किराणा दुकानदारांना विक्री करण्यास कायद्याने मनाई आहे मात्र जे सॅनिटायझर सौंदर्य प्रसाधने किंवा आयुर्वेदिक कायद्यान्वये तयार करण्यात आले आहे त्याची विक्री किराणा दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांना करता येणार असल्याचे जळगावचे अन्न व औषध निरीक्षक यांनी सांगितले आहे.
पक्के बील आणि उत्पादक तपासूनच माल खरेदी करावा
जळगाव जिल्ह्यातील किराणा दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांनी कोणतेही सॅनिटायझर खरेदी करताना त्याचे पक्के बील तपासून घ्यावे तसेच त्या सॅनिटायझरचे उत्पादक देखील तपासावे असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून करण्यात आले आहे.