नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमधील पँगाँग त्सो सरोसराच्या दक्षिण किनाऱ्यावरील परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. ७ सप्टेंबर रोजी आपले सैनिक चर्चेसाठी गेले असता त्यांच्यावर भारतीय सैनिकांनी गोळीबार केला, असा आरोप चीनच्या पश्चिमी कंमांडरने केला आहे. चीनचा आरोप खरा असेल तर, सुमारे ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान गोळीबार झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, चीनी सैनिक मुखपारी टेकडीवर कब्जा करण्याच्या हेतूने गलवानसारखी हिंसक घटना घडवू इच्छित होते आणि म्हणूनच भारतीय सैनिकांना हवेत गोळीबार करावा लागला, असे भारतीय सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतीय जवानांनी चुशूल सेक्टरमध्ये २९ आणि ३० ऑगस्टला पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यापासून ते रिचिन ला पर्यंत सर्व उंच टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. याच भागामध्ये सन १९६२ मध्ये भारत आणि चीनदरम्यान युद्ध झाले होते. भारतीय जवानांनी ताबा मिळवलेल्या भागाला ग्रे झोन असे म्हटले जाते. या भागावर दोन्ही देश आपला दावा करत आहेत. आतापर्यंत या भागावर कोणाचाही ताबा नव्हता. भारतीय जवानांनी आता या टेकड्यांवर आपला ताबा मिळवला आहे. यामुळे चीन अतिशय संतापला आहे. या भागातून आता चीनी सैनिकांच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मोल्डो सैन्य तळ आणि स्पांगूर सरोवरावर भारतीय जवानांना पूर्णपणे नजर ठेवणे शक्य होणार आहे.
भारतीय सैनिक आता चीनी सैनिकांच्या कोणत्याही हालचाली अगदी सहजपणे पकडत आहेत आणि म्हणूनच चीनच्या अंगाचा तिळपापड होत आहे. या पूर्वी चीनच्या उंच भागांवर ताबा होता, मात्र भारतीय सैनिकांच्या कारवाईमुळे ही स्थिती बदलली आहे. युद्धजन्य स्थिती उद्भव्ल्यास आता भारतीय सैनिक केव्हाही मोल्डो सैनिकी तळ डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या आत उद्ध्वस्त करू शकणार आहेत. यामुळेच चीन संतापला आहे.