सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी नवीन स्वस्त धान्य दुकानाची मागणी

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रीम कॉलनी परिसरात नवीन स्वस्त धान्य दुकान सुरु करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित कोळी यांच्या माध्यमातून पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की, कोरोना महामारीमुळे राज्यात नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून त्यात लॉकडाऊन काळात सर्व व्यवसाय बंद असल्यामुळे उदरनिर्वाह करण्यास नागरिकांच्या हाल अपेष्ठा होत आहे. सुप्रीम कॉलोनी परिसरातील नागरिकांकडे स्वस्त धान्य कार्ड असून मात्र त्यांना स्वस्त धान्य मिळण्यास अतिशय त्रास होत आहे. सुप्रीम कॉलनी परिसरात स्वस्त धान्य दुकान नसल्यामुळे मेहरूण परिसरात ३ ते ४ कि.मी. पर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. तसेच त्यासाठी १५० रु . ते २०० रु . इतका खर्च येत असल्यामुळे तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांचा बारा अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक अद्ययावत न झाल्यामुळे त्यांना धान्य मिळत नसल्यामुळे नागरिकांवर कोरोना महामारी सारख्या भयानक काळात उपासमारीची वेळ आलेली आहे. १२ अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक करण्यासाठी शहरातील तहसील कार्यालयात नागरिक वारंवार ये – जा करत असून सुद्धा नागरिकांना १२ अंकी क्रमांक मिळत नाही. याची चौकशी करून संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावे व या उपासमारीच्या परिस्थितीत जरी रेशन कार्डधारकांकडे १२ अंकी स्वस्त धान्य ग्राहक क्रमांक नसेल तरी सुद्धा प्रयत्न करून जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांना धान्य वितरण करण्यात यावे. तसेच सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी नव्याने स्वस्त धान्य दुकान सुप्रीम कॉलनी परिसरात सुरु करण्यासाठी संबंधित विभागास आदेश द्यावेत. निवेदनावर ललित कोळी, कल्पेश निकम, अतुल पाटील, शुभम चव्हाण, प्रवीण पाटील, राहुल पाटील, नथू पाटील, मनोज कुमार, मोहन कोळी आदींची यावेळी उपस्थिती होती.

Protected Content