जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर नोंदणीकृत पदवीधरांमधून निवडून द्यावयाच्या दहा जागांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत बुधवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दोन निकाल हाती आले. त्यामध्ये अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर, विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगातुन दिनेश चव्हाण आणि महिला संवर्गातून स्वप्नाली महाजन हे तिघे विजयी झाले. उर्वरीत सात जागांची मतमोजणी सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती.
रविवार दिनांक २९ जानेवारी रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७ मतदान केंद्रावर एकुण सरासरी ४९ टक्के मतदान झाले होते. दहा जागांसाठी २७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. खुल्या संर्वगात ५ जागांसाठी ११ उमेदवार, इतर मागास संर्वगात एका जागेसाठी ३ उमेदवार, अनुसूचित जाती संर्वगात एका जागेसाठी ४ उमेदवार, अनुसूचित जमाती संर्वगात एका जागेसाठी २ उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगात एका जागेसाठी ३ उमेदवार आणि महिला संर्वगात एका जागेसाठी ४ उमेदवार उभे आहेत.
एकुण २२ हजार ६६३ मतदारांची नोंदणी झाली होती पैकी ११ हजार १३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५.३० वाजता पहिला निकाल हाती आला. अनुसूचित जमाती संवर्गातून नितीन ठाकूर व भिमसिंग वळवी हे दोघे उमेदवार उभे होते एकूण ११ हजार १४१ मतांपैकी ८५१ मते अवैध ठरली. नितीन ठाकुर यांना ७ हजार ६७६ मते प्राप्त झाली तर भिमसिंग वळवी यांना २ हजार ६१४ मते मिळाल्यामुळे ठाकुर यांना विजयी घोषित करण्यात आले. विमुक्त जाती/भटक्या जमाती संर्वगातुन दिनेश चव्हाण विजयी झाले. त्यांना ७ हजार १५१ तर प्रतिस्पर्धी नितीन नाईक यांना २ हजार २९२ व सचिन जाधव यांना ७४३ मते मिळाली. या संवर्गात ९५५ मते अवैध ठरली. महिला संवर्गात स्वप्नाली महाजन यांना पहिल्या फेरीत कोटयापेक्षा अधिक मते प्राप्त झाल्याने विजयी घोषित करण्यात आले. या संवर्गात वंदना पाटील यांना २ हजार ४६७, भाग्यश्री महाजन यांना ७२३ तर ज्योती कढरे यांना ५४७ मते प्राप्त झाली. या संवर्गात १ हजार १६६ मते अवैध ठरली. विजयी उमेदवारांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्र देण्यात आले.
बुधवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या कर्मचारी भवनात मतमोजणीला सुरूवात झाली. मतपेट्या सील करून ठेवण्यात आलेला कक्ष उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात आला. त्यानंतर ६ टेबलांवर मतपेट्या उघडण्यात येवून मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत मतपेट्या उघडण्याचे काम सुरू होते. त्यानंतर मतपत्रिकांचे संवर्गनिहाय एकत्रिकरण करण करण्यात आले. वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करून वैध मतांच्या आधारे निवडून येण्यासाठीचा कोटा निर्धारित करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत कोटा निश्चितीचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाली. सकाळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे हे मतमोजणीच्या ठिकाणी काही वेळ उपस्थित होते. मतमोजणीच्या कामी ११० अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग होता. यावेळी देखील मतमोजणीस महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. मतमोजणीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपस्थित होणाऱ्या शंकाचे निरसन कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद पाटील यांनी केले.