जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीवासियांना अमृत योजनेंतर्गत सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून दोन दिवस सुरू असलेले मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम पहाटे ६ वाजता संपले. महापौर भारती सोनवणे यांनी दुपारी कामाची पाहणी केली. दरम्यान, साहित्या नगरात अमृतची पाईपलाईन टाकण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असता तात्काळ काम हाती घेण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.
सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन जोडणी आणि भूमीगत पाणी साठवण टाकीची पाहणी करताना महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, मनपा अभियंता योगेश बोरोले, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदी उपस्थित होते.
वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला सुप्रीम कॉलनीतील अमृत योजनेची जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे ६ वाजता काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत १५ लक्ष लिटरची भूमीगत पाणी साठवण टाकी तयार करण्यात आली असून त्याठिकाणी उच्च क्षमतेचे २ पंप बसविण्यात आले आहेत. जळगाव शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस चालणार असून उद्या दुपारी सुप्रीम कॉलनीची टाकी भरण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. टाकी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उद्या किंवा परवा चाचणी घेतली जाणार आहे.
सुप्रीम कॉलनीतील नितीन साहित्या नगरात अद्याप अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आलेली नसून नागरिकांना १० ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होतो. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे नागरिकांनी याबाबत तक्रार केली असता त्यांनी लागलीच मनपा अभियंता आणि मक्तेदार प्रतिनिधीकडून माहिती घेतली. नागरिकांना लवकरात लवकर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी अमृतची पाईपलाईन टाकण्याचे काम दोन दिवसात हाती घेत १ महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.