मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने ३ जानेवारीला राज्यभर शिक्षण दिन साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महिला शिक्षण दिन साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
हा उपक्रम जिल्हा आणि तालुका स्तरावरील तसेच गावपातळीवर देखील साजरा करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी शिक्षणाचे प्रतिक म्हणून पणतीचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर महिला शिक्षिका व बिकट परिस्थितीतून उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींचा पुस्तक देऊन सत्कार केला जाणार आहे.
राष्ट्रवादीच्यावतीने या कार्यक्रमाला काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीबरोबरच तालुका व जिल्हास्तरावर अधिकाधिक महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहनदेखील प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.