सावदा ता.रावेर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – सावदा शहर व ग्रामीण परिसरात भारनियमन आणि वीजटंचाईमुळे वीजपुरवठा सुरळीतपणे व्हावा, यासाठी वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध महावितरण प्रशासनाने धडक कारवाई मोहीम राबविली.
सध्यस्थितीत राज्यासह जिल्ह्यात विजतुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असून अनेक ठिकाणी महावितरण ग्राहकांकडूनच वीजचोरी केली जात आहे. तर दुसरीकडे वीज टंचाईमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र या वीजटंचाईमुळे भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सावदा महावितरण उपविभागाकडून मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यां ग्राहकांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या सप्ताहात २७० ग्राहकांच्या वीजमीटरची तपासणी करण्यात आली.
सावदा शहर ५ , निंभोरा ७, तासखेडा १०, खिरोदा ७, चिनावल ६, सिंगनूर ९, मस्कावद ५, कोचुर ३ अशी कारवाई करण्यात आली असून फेरफार असलेले ३३ मीटर जप्त करण्यात आले आहे. तर वीज चोरी करणाऱ्या ५२ जणांविरुद्ध विविध कलमानुसार सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्या आदेशानुसार तसेच उपकार्यकारी अभियंता राजेश नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यात सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योगेश चौधरी, सागर डोळे, योजना चौधरी, मंगेश यादव, सचिन गुळवे, सोनाल पावरा आदींनी केलेल्या धडक कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वा सर्व प्रकारच्या वर्गवारीतील महावितरण वीज ग्राहक नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये, अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
उप कार्यकारी अभियंता राजेश नेमाडे.