मुंबई प्रतिनिधी । अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच चकमक उडाली.
आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीर सावरकरांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काँग्रेसच्या मासिकात वापरण्यात आला. त्यामुळे सत्ताधार्यांनी शिदोरी मासिकावरही बंदी घालावी आणि आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत गौरव प्रस्ताव आणावा अशी मागणी त्यांनी केली. यावर भाजपाने ज्या प्रस्तावाची मागणी केली आहे. त्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या मग अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतो, यावर नितेश राणे यांचे मत घ्या, त्यांना प्रस्ताव मांडायला सांगा असा पलटवार संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्य सरकारने यापूर्वी केंद्र सरकारला पत्र लिहून स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली आहे. मात्र अद्याप केंद्राने ही मागणी पूर्ण केली नाही. केंद्रात भाजपाचं सरकार आहे. त्यामुळे विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे यासाठी प्रयत्न करावेत, आम्हीही प्रयत्न करतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, वारंवार भाषणामधून देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या मासिकात जो उल्लेख केला आहे. त्यातील सावरकरांबद्दल मजकूर वाचून दाखवत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करताय असे जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिले.