सार्वजनिक सत्यधर्म आचरणाचे अग्रदूत ; महात्मा फुले

 

महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून विचारांची मांडणी केली  महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या ‘The Right Of Man’ या पुस्तकाचा प्रभाव होता.

 

महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. त्यांचा  जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

 

महात्मा फुले यांनी लिहलेला ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ‘दीनबंधू’ हे साप्ताहिक चालविले जात असे. संत तुकारामाच्या अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक ‘अखंड’ रचले. ‘गुलामगिरी’ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

 

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”

असे सांगणारे, स्त्री शिक्षणाचे जनक, देशात सर्वप्रथम  ‘शिवजयंती’ सुरु करणारे, महान सामाजिक  क्रांतिकारक, उत्तम उद्योजक, सत्य शोधनाचे प्रणेते,

शिवरायांवर पहिला सर्वोत्तम पोवाडा लिहिणारे शिवशाहीर, मानवतावादी चळवळीचे अग्रदूत , क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले” यांच्या क्रांतीकारी संघर्षाला, जयंती दिनी प्रणाम

 

Protected Content