मुंबई (वृत्तसंस्था) सामना, शिवसेना आणि ठाकरे ही तिन्ही नावं वेगळी होऊ शकत नाहीत. म्हणून रश्मी ठाकरे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. संजय राऊत आमच्या घरातले आहेत. संपादकीय विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे कायम राहील’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. विधानभवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संजय राऊत घरचा माणूस आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या संपादकीय विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडेच आहे. ‘सामना’तील भाषा ही आमची पितृभाषा आहे. ‘सामना’च्या संपादकपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे गेली, तरी ‘सामना’ची भाषा आणि दिशा बदलणार नाही. दरम्यान, प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेण्यासाठी येत्या सात मार्चला अयोध्येला जाणार आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी यावे. मात्र देवदर्शनात राजकारण नको, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.