जळगाव, प्रतिनिधी । राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय म्हणून साजरा करण्यात येतो. येथील जिल्हा परिषदेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास माल्यार्पण करून अभिवादन केले.
सहाय्यक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, जळगाव व जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे याकरीता प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळालेल्या जिल्ह्यातील एका जोडप्याचा प्रातिनिधीक स्वरुपात पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला. समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गींयासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी . डिगबंर लोखंडे यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे सन २०१८-१९ चे केंद्र हिस्स्याचे अनुदान अप्राप्त होते. यासाठी पालकमंत्री व समाजकल्याण सभापती यांनी पाठपुरावा केल्यानंतर जिल्ह्यातील १६० जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे रक्कम लाभार्थ्यांच्या खाती जमा करण्यात आली असल्याचेही श्री. लोखंडे यांनी प्रास्ताविकात नमूद केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण समितीचे सभापती जयपाल बोदडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, बी. ए. बोटे, डिगंबर लोखंडे आदि उपस्थित होते.