यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। तालुक्यातील साकळी येथील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या वतीने “एक गाव- एक दिवस’ अभियान राबविण्यात येत आहे. याला ग्राहकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यातील साकळी येथील महावितरणच्या संबधीत कार्यालयाकडून गेल्या काही दिवसांपासून साकळी कक्षामध्ये ‘ एक गाव – एक दिवस ‘अभियान यशस्वीपणे राबविले जात आहेत. या अभियानाअंतर्गत वीज वितरणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तसेच साकळीचे कक्ष इन्चार्ज निलेश महाजन यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली गावात वीज वितरण संबंधीच्या विविध तक्रारींचे निरसन केले जात आहे. विज वितरण बाबत योग्य त्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. यात साकळी येथे इंदिरानगर प्लॉट भाग, भवानी माता मंदिरासमोरील परिसर, अक्सा नगर, खूशालनगर अशा भागातील जवळपास २५ गाळेमध्ये सिंगल ए बी नवीन केबल करण्यात आलेली आहे. तसेच एकूण ६९ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे देखभाल दुरुस्तीच्या कामा अंतर्गत इंदिरा नगर भागात मधील सुमारे पाच घरावरील अतिशय धोकेदायक व जीर्ण झालेले कंडक्टर काढून ग्राहकांना भविष्यात संभावित धोका टाळला आहे. त्याचप्रमाणे गावात मुख्य वापराच्या रस्त्यावरील मोठया व्यापारी संकुलाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून लोंबकळणाऱ्या जुन्या व जिर्ण तारांची मोठी जीवघेणी समस्या निर्माण झालेली होती.या तारांच्या खालून अनेक मालवाहतूक वाहनांचा तसेच हजरत सजनशहावली बाबांच्या दर्ग्यावर जाणाऱ्या भाविक भक्तांचा तसेच इतर नागरिकांचा वापर आहे.तथापि सदरील जुन्या व जीर्ण तारांची अवस्था पाहता या ठिकाणी मोठी घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली होती. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या भागात उच्च दाब लाईनच्या खाली एक- एक पोल उभा करून तारा वर करण्यात आल्या. यामुळे या भागातील विज तारांची समस्या कायम स्वरूपी सुटण्यास मदत झाली आहे.त्याचप्रमाणे साकळी कक्षाअंतर्गत शेती शिवारातील विज पंपांचे थकबाकी बिल भरण्यासंदर्भात विशेष मोहीम राबविण्यात आली. यात सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले व मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला. जवळपास १४१ शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा केला व मोहिमेअंतर्गत वीज वितरण ची जवळपास नऊ लाखांची वसुली करण्यात आली. तसेच एक गाव -एक दिवस या अभियानाअंतर्गत यापुढेही साकळी कक्षात ज्या-ज्या ठिकाणी विज वितरण संबंधी कामे असतील, काही अडचणी असतील त्या सोडवल्या जाणार आहे व विजेमुळे भविष्यात उद्भवणारा धोका टाळला जाणार आहे.
सदरील ग्राहकाभिमुख असलेले एक गाव – एक दिवस हे अभियान राबवण्यासाठी साकळी कक्ष इन्चार्ज निलेश महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कक्षातील कर्मचारी विलास तायडे, लाईनमन नितीन पाटील, खेमकांत सोनवणे (वरिष्ठ तंत्रज्ञ) तसेच अय्युब तडवी(आ.सो.)यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.