अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील झाडी येथील शेतकऱ्याचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जिजाबराव खंडू पाटील (वय-५२) रा. झाडी ता.अमळनेर हे त्यांच्या झाडी शिवारातील शेतात बुधवार १६ नोव्हेंबर रोजी कपाशी वेचण्यासाठी गेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना त्यांना सापाने चावा घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांचे भाऊ प्रवीण पाटील यांनी तातडीने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. या घटनेबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहे.