नवी दिल्ली : वृत्तसंस्था । ट्विटरनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाऊंटचं ब्लू टीक हटवलं आहे. सरसंघचालकांसह अनेक आरएसएस नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टीक हटवत ‘अनव्हेरिफाईड’ केले आहेत.
यापूर्वी, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचंही वैयक्तिक ट्विटर अकाऊंट अनव्हेरिफाईड करण्यात आलं होतं. सहा महिन्यांहून अधिक काळापासून हे ट्विटर अकाऊंट लॉग इन करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे अकाऊंटची ब्लू टीक हटवण्यात आल्याचं स्पष्टीकरण ट्विटरनं दिलं होतं. मात्र, गोंधळानंतर काही तासांतच व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक कंपनीकडून रिस्टोअर करण्यात आली. केंद्र सरकारच्या नाराजीमुळे ट्विटरनं एक पाऊल मागे घेतल्याचं समजलं जातंय.
नव्या आयटी नियमांसंबंधी ट्विटर आणि केंद्र सरकार दरम्यान सुरू असलेल्या वादानंतर कंपनी आणि चर्चित नेत्यांमध्ये ‘ब्लू टीक’ अध्याय घडलाय. त्यामुळे केंद्र सरकार आणि मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्विटर दरम्यान वाद वाढत चाललाय.
राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टीक हटवण्यात आलीय. यामध्ये सुरेश सोनी, सुरेश जोशी, कृष्णगोपाल तसंच संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांचाही समावेश आहे.
ट्विटरच्या धोरणानुसार, अकाऊंट इनअॅक्टिव्ह झालं तर कंपनी कोणत्याही सूचनेशिवाय वापरकर्त्याचं ब्लू टीक / व्हेरिफाईड स्टेटस हटवू शकते. मात्र, वापरकर्त्यांकडून अशा काही अकाऊंटसचे स्क्रीनशॉट शेअर केले जात आहेत जे अकाऊंट सहा महिन्यांहून अधिक काळापासून इनअॅक्टीव्ह आहेत, परंतु, कंपनीनं मात्र त्यावर कारवाई केलेली नाही. असे ‘व्हेरिफाईड’ अकाऊंटच्या स्क्रिनशॉटसहीत वापरकर्ते ट्विटरला प्रश्न विचारत आहेत.