सरपंचाच्या मनमानीला कंटाळून आसनखेडा येथील पाच ग्रा . प . सदस्यांचे राजीनामे

 

पाचोरा, प्रतिनिधी |   तालुक्यातील आसनखेडा येथील सरपंचांच्या मनमानीला कंटाळून अवघ्या  अडीच  महिन्यात ५ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे

 

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत  निवडणुकीत आसनखेडा  येथे भाजपापुरस्कृत एकता पॅनल विरोधात शिवसेना व राष्ट्रवादी पुरस्कृत महाविकास आघाडी पॅनलमध्ये सरळ लढत झाली होती. एकूण ९ सदस्य संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये भाजपाच्या एकता पॅनलला दोन व महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला एक जागा बिनविरोध करण्यात  आली होती . त्यानंतर प्रत्यक्ष उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा प्रणीत पॅनलने ४ तर महाविकास आघाडी प्रणित पॅनेलने २ जागांवर विजय मिळविला होता.

 

सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) निघाल्यानंतर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने भाजपा पॅनलच्या दोन सदस्यांना सोबत घेऊन फोडाफोडीचे राजकारण करत महाविकास आघाडीचा सरपंच बनवून सत्ता स्थापन केली होती. या सत्तास्थापनेला अवघे अडीच महिने होत नाही तोच भा. ज. पा. पॅनलच्या उषाबाई पाटील, विरेंद्र  पाटील, पूजाबाई गायकवाड, मंगलाबाई पाटील, धनराज मोरे या ५ सदस्यांनी ३० एप्रिलरोजी आसनखेडा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात ग्रामसेवक शरद पाटील व सरपंच इंदिराबाई पाटील यांच्याकडे राजीनामा सोपवला

 

तालुक्यात सर्वत्र याबाबतीत चर्चा सुरू आहे. राजीनामा देणाऱ्या भाजपा पॅनलचे सदस्यांना विचारणा केली असता आसनखेडा गावात सरपंच यांनी मनमानी कारभार सुरू केला असून विकास कामे व इतर नागरिकांच्या समस्या सोडविणेबाबत त्यांच्याकडे वारंवार सांगूनदेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होत्या समस्या सोडवण्याऐवजी चुकीच्या गोष्टींना पाठराखण करीत असत  कोरोना महामारीमध्ये गावात रुग्णसंख्या वाढत असतांना कुठलेही नियोजन नाही व उपाययोजना नाहीत अशा नियोजनशून्य कारभारामुळे गावातील जनतेला त्याचा परिणाम भोगावा लागत होता. जनतेने आम्हाला त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडून दिले असून समस्या वारंवार सांगूनदेखील सुटत नसतील तर आम्ही भाजपाप्रणित एकता पॅनलचे सदस्य राजीनामा देत आहोत. असे त्यांनी सांगितले.

 

९ सदस्य असणाऱ्या आसनखेडा ग्रामपंचायतीतील ५ सदस्यांनी राजीनामा दिल्याने संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी प्रणित पॅनलचे सरपंच पद जाणार असल्याच्यादेखील चर्चा  होत आहेत. असे झाल्यास आसनखेडा ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक केली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content