नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सरकारने परवानगी दिल्यास मी मजुरांसोबत चालत उत्तर प्रदेशला जाईन. एकाच्या नाही १०-१५ जणांच्या बॅगाही उचलेन, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या टीकेला आज प्रत्युत्तर दिले.
कोरोना आणि लॉकडाऊनवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला चढवला. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्थलांतरीत मजुरांची भेट घेत, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या होत्या. त्यावर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी मजुरांशी चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या बॅगा उचलून त्यांच्यासोबत काही काळ चालले असते तर ते बरे झाले असते, असे म्हणाल्या होत्या. टीकेला राहुल गांधी यांनी आज प्रत्युत्तर दिले असून, मी मजुरांच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. खरे सांगायचे तर यामुळे मला खूप फायदा होतो. त्यांची माहिती आणि त्यांच्याकडील ज्ञानामुळे मला फायदा होतो. मदतीचे म्हणाल तर मी मदत करतच असतो. आता त्यांनी मला परवानगी दिल्यास मी मजुरांच्या बॅगाही उचलेन. एकाच्याच नाही तर १०-१५ जणांच्या बॅगा उचलून घेऊन जाईन. निर्मला सीतारामन यांची इच्छा असेल तर मी इथून उत्तर प्रदेशला जाईन. परवानगी दिल्यास चालत जाईन. वाटेत जेवढ्या लोकांची मदत करता येईल तेवढ्यांना मदत करेन.