मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाच्या या कठीण प्रसंगामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जनता सरकारच्या प्रयत्नांच्या पाठीशी उभी राहील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे असं मत शरद पवार यांनी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधासंदर्भात बोलताना फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रामध्ये पाच एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांवरुन दुकानदार, व्यापारी आणि राजकीय नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला
नव्या निर्बंधांसंदर्भात दुकानदार, व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख पवारांनी केला. नाशवंत भाजीपाल्याचं काय करायचं असा प्रश्न शेतकरी आणि व्यापारी वर्गापुढे आहे याचीही जाणीव आपल्याला असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. मात्र सध्या घेतलेला निर्णय आणि निवडलेला मार्ग हा यशाचा मार्ग करायचा असेल तर या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उपलब्ध राहिलेला नाही, असं पवार म्हणाले. वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही याची जाणीव सामाजातील सर्व घटकांनी ठेवणं गरजेचं आहे. राज्य सरकारकडून जनतेच्या हितासाठी नाइलाजास्तव काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागले आहेत, असं पवारांनी स्पष्ट केलं. मागील वर्षी आपण कोरोनाला उत्तम प्रकारे तोंड दिला. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत आताची संख्या पाहिल्यास सध्याच्या वाढीचा वेग चिंताजनक आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. कोरोना किती प्रमाणात वाढतोय हे सांगताना पवारांनी आकडेवारीही सादर केली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने काही कठोर निर्बंध लागू केले केंद्र सरकारनेही या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कठोर पावलं टाकण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं आहे, परिस्थिती पाहून सध्या राज्य सरकारकडून निर्णय घेतले जात असल्याचं पवारांनी फेसबुक लाइव्ह दरम्यान सांगितलं. त्यामुळेच सर्वांचं सहकार्य मिळण्याची नितांत आवश्यकता असल्याची विनंती पवारांनी राज्यातील जनतेकडे केलीय. नेते, प्रसारमाध्यमे, सार्वजनिक क्षेत्रातील काम करणाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा द्यावा. नागरिक आणि समाजातील सर्व घटक इतर साऱ्या गोष्टी बाजूला ठेऊन एकत्र येतील असा विश्वास मला आहे, असंही पवार म्हणाले.