औरंगाबाद , वृत्तसंस्था | राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पावसाने पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन कृषी मंत्री दादा भुसे यांनी नुकसानीची पाहणी केली. कृषी मंत्री दादा भुसे यांनी यावेळी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे कबूल करत पैसे उभा करु, असेही पुढे सांगितले. तसेच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढील तीन महिने शेतकऱ्याला मदत करणे शक्य नसल्याचं स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना भुसे म्हणाले की, येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या त्यांच्याकडे अतिवृष्टीमुळे किती नुकसान झाली याची आकडेवारी नाही. मात्र येत्या आठ दिवसात ही आकडेवारी आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात बोलू. सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येईल अशी परिस्थिती नसल्याचे शासनाच्या तिजोरीत सध्या पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे, असं भुसे म्हणाले. मात्र, शेतकऱ्यांना मदतीसाठी वाटेल ते करु पण शेतकऱ्याला मदत करु, असंही ते म्हणाले.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील सोयगाव तालुक्यातील काही गावांच्या नुकसानीची पाहणी केली. मंत्री सत्तार यांनी देखील स्पष्ट म्हटलं आहे की, सरकारकडे पैसा नाही सर्व पैसा कोरोना उपचारांसाठी लावला आहे. पुढील तीन महिने तरी हा पैसा उभा करणं शक्य नाही. पण शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे वार्यावर सोडणार नाही वेळ प्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करू, असंही सत्तार म्हणाले.