मुंबई प्रतिनिधी | एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्यावर मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याचा केलेला आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फेटाळून लांवला आहे.
एनसीबीनं मुंबईत क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह एकूण ८ आरोपींना अटक केल्यानंतर ही कारवाई करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा खळबळजनक आरोप करत त्याविषयी तक्रार केली. यासंदर्भात आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतांना हा दावा फेटाळून लावला. गृहमंत्र्यांनी तशा कोणत्याही सूचना कुणाला दिल्या नसल्याचं सांगत समीर वानखेडेंचे आरोप फेटाळून लावले.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, मला वाटत नाही की मुंबई पोलिसांचे अधिकारी वॉच ठेवतात वगैरे. तशा कोणत्याही सूचना कुणालाही दिलेल्या नाहीत, असं दिलीप वळसे पाटील यावेळी म्हणाले. तसेच, त्यांच्या आरोपांविषयी आपल्याला फार माहिती नाही, त्याची अतिरिक्त माहिती घेऊन मी त्यावर बोलेन, असं देखील वळसे पाटील यावेळी म्हणाले.