मुंबई : वृत्तसंस्था । समाजाला राजकारणातली ‘बिटविन द लाइन्स ‘ समजली पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांचीही भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. पडद्यामागे काही घडतंय की काय असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. असं असलं तरी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सगळं फेटाळून लावलं जात आहे. याच भेटीचा उल्लेख करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘बिटविन द लाइन्स’ भाष्य केलं.
महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती आणि भविष्यवेधातील राजकारण याचा वेध घेणारी वेबमाला ‘लोकसत्ताने आयोजित केली आहे. या वेबिनारमध्ये आज महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संवाद यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. “इतकी भांबावलेली राजकीय परिस्थिती मी इतक्या वर्षात कधीच पाहिली नाही. मी असं वातावरणच कधी पाहिलं नाही. या संपूर्ण देशामध्ये मला कळतच नाही की कोण कुणाचा राजकीय शत्रू आहे आणि कोण कुणाचा राजकीय मित्र आहे. यांच वाजलंच आहे, असं एकवेळ आपल्याला असं वाटायला लागतं आणि दोन दिवसांनी समजतं दोघंही एकमेकांना भेटले आणि दोघांनी एकमेकांशी चर्चा केली,” असं राज ठाकरे म्हणाले.
“महाराष्ट्रातील सरकार आपण बघितलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पद हवं म्हणून ते राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर गेले. मग वाटलं की, भाजपा आणि यांचं वाजलं. मध्येच नरेंद्र मोदी आणि त्यांचं बोलणं होतं. आणि ते वेगळ्याच विषयांवर होतं. तब्येत चांगली आहे ना. घरंच सगळं व्यवस्थित आहे ना… बाकी काय सुरू आहे… अशी होते. यात राजकीय मतभेद बाजूला सारून वैयक्तिक मतभेद नसतात हे मानलं तर… आता परवा फडणवीस शरद पवारांना भेटून आले. मग शरद पवार अहमदाबादला अमित शाह यांना भेटून आले. मग अजून कुणीतरी कुणाला भेटलं. मला समजतचं नाहीये. २०१४ पूर्वीपर्यंत एक विरोधी पक्ष आणि एक सत्ताधारी पक्ष असं होतं. आता या क्षणी बघितलं, तर ममता बॅनर्जी हा एक पक्ष आणि भाजपा विरोधी पक्ष…”, असं राज ठाकरे म्हणाले.
“मी लोकांना सांगत आलोय की, तुम्हाला फक्त राजकारणच करायचं असेल, तर हा विकास हवा कशाला. समाज सुशिक्षित असून, चालत नाही, तो सुज्ञही असावा लागतो, तर त्याला अर्थ आहे. बाळासाहेब व्यंगचित्रकाराबद्दल नेहमी एक वाक्य सांगायचे की, व्यंगचित्रकार हा व्यंगचित्रकार का असतो, कारण तो नेहमी दोन ओळींच्या मधलं वाचतो. सुशिक्षित सुज्ञ समाजाला वर्तमानपत्रांच्या किंवा चॅनेलवरील बातमीच्या दोन ओळींमधील वाचता आलं पाहिजे” असं मतही राज यांनी यावेळी नोंदवलं.