मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर समर्थक आक्रमक बनले असून त्यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर अजित पवारांनी मात्र नवीन अध्यक्ष हवा असे म्हटले आहे.
मुंबईत आज लोक माझे सांगाती या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. यात काही खळबळजनक राजकीय गौप्यस्फोट असतील असे मानले जात होते. मात्र पुस्तक तर बाजूलाच राहिले, पण शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी तीन वर्षानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचे सूतोवाच केल्याची घोषणा करताच समर्थक आक्रमक बनले. त्यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली. तर काहींनी अन्न-पाण्याचा त्याग करून उपोषण करण्याचे सांगितले.
सभागृहात उपस्थित असलेल्या बहुतांश नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या निर्णयाचा धक्का बसला. त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी सर्वांनीच मागणी केली. यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर, अजित पवार यांनी मात्र हा निर्णय केव्हा तरी होणारच होता असे नमूद करत या निर्णयाला पाठींबा दिला. यामुळे निवृत्तीच्या घोषणेच्या नंतर पक्षात दोन प्रवाह असल्याचे दिसून आले.