मुंबई: वृत्तसंस्था । ‘एकछत्री अंमल गाजवण्यासाठी जे आडवे येतील त्यांना मिळेल त्या हत्याराने दूर करा. असे एक आणीबाणीसदृश्य धोरण सध्या देशात राबवले जात आहे.,’ असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
काही झाले तरी सतेसाठी कोणत्याही थराला जायचे. सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी यांचा वापर करायचा. हे तर रशिया, चीनपेक्षा भयंकर आहे असा टोलाही त्यांनी हाणला आहे शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील लेखात त्यांनी देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
‘आज देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, पण धर्माचे राज्य आहे काय?,’ असा खोचक प्रश्न राऊत यांनी केला आहे. ‘जेथे भाजपचे राज्य नाही तेथे अधर्म सुरू आहे असा प्रोपोगंडा सुरूच आहे व जे भाजपला हवे असलेल्या धर्माचे राज्य आणण्यास विरोध करतील त्यांना लगेच निपटवून टाकायला हवे असे काही लोकांना वाटते. शरद पवारांपासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळ्यांना ‘निपट डालो’ हा नवा अजेंडा राबवायचा. सुशांत प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांना निपटण्याचे प्रयत्न झाले ते त्यांच्यावरच उलटले,’ . असेही संजय राऊत म्हणाले…
‘एखाद्या राज्यात भाजपविरोधी सरकार स्थापन होणे हे काही घटनाविरोधी नाही, हे दिल्लीतील राज्यकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. पण जेथे आपल्या विरोधी सरकारे आहेत, त्या राज्यांत पॉलिटिकल एजंट म्हणून राज्यपाल नेमायचा व राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य अस्थिर करायचे हे धोरण चांगल्या राज्यकर्त्यास शोभत नाही.
प. बंगालात राज्यपाल धनखर हे ममता बॅनर्जींविरोधात रोज नवी आघाडी उभारत आहेत. ममता बॅनर्जीही लढाईत मागे हटत नाहीत. दिल्लीत केजरीवाल विरुद्ध राज्यपाल झगडा आहेच. पंजाबातील लढवय्या शीख समाज अंगावर उसळला तर गडबड होईल म्हणून तेथे कुणाची हिंमत होत नाही. महाराष्ट्रात राज्यपालांनी प्रयत्न करूनही ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. राजस्थानात अशोक गेहलोत यांचे सरकार अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न फसले हे सत्य आहे. महाराष्ट्रापेक्षा गंभीर प्रश्न गुजरात, हरयाणासारख्या राज्यांत निर्माण झाले. गुजरातमध्येही सोमनाथ, अक्षरधामसारखी मंदिरे बंद आहेत; पण महाराष्ट्रात मंदिरे बंद म्हणून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना खोडसाळ पत्र लिहिले,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे.
‘नरेंद्र मोदी हे भगवान श्रीकृष्ण आणि अमित शहा हे अर्जुन असे त्यांच्या भक्तांना वाटत असेल तर त्यांचे काही चुकत नाही, पण खऱ्या धर्मस्थापनेचे, देशावरील संकटे दूर करण्याचे काम त्यांनी करावे इतकीच अपेक्षा आहे,’ असा चिमटाही राऊत यांनी काढला आहे.