मुंबई : वृत्तसंस्था । “भाजपा विरोधातील सरकार असलेल्या ठिकाणी ईडी, एनआयए हे नवीन नाही. सचिन वाझे प्रकरणाच्या आडून मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपा महाराष्ट्र पोलिसांचा अपमान करत आहे, हे काँग्रेस कधीच सहन करणार नाही.” असं नाना पटोले म्हणाले .
सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम झालेलं आहे. दररोज नवीन घडामोडी समोर येत आहेत. भाजपाने आक्रमक भूमिका घेत महाविकासआघाडी सरकारला धारेवर धरलं आहे. तर, सचिन वाझे व हिरेन प्रकरणाचा तपास एनआयए व एटीएस करत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलातना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपावर जोरादार टीका केली.
सचिन वाझे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त बदलण्याबाबत बोललं जात आहे यावर बोलताना पटोले म्हणाले, “कुणाला आयुक्त ठेवावं कुणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या सर्व बदल्यांचा अधिकार हा मुख्यमंत्र्याकडे असतो आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील.” तर, आज झालेल्या बैठकीबाबत माहिती सांगताना ते म्हणाले, “सर्व मुद्य्यांवर सविस्तर चर्चा झाली, महामंडळाच्या मुद्यावर देखील चर्चा झाली. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडलेली आहे. याबाबत पूर्वीही वाद नव्हता व भविष्यातही राहणार नाही”. तसेच, वीजबिल प्रश्नाबाबत ऊर्जा विभागाकडून मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवलेला आहे. त्यानंतर ताबडतोब निर्णय घेतला जाणार आहे, अशी देखील माहिती त्यांनी दिली. मंत्रीमंडळातील खांदेपालटाबाबत कुठल्याही चर्चा सध्यातरी नाही ज्यावेळेस होईल तेव्हा आपल्याला कळेलच, असंही पटोले म्हणाले.
“सचिन वाझे प्रकरणाच्या आडून खासदार मोहन डेलकर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. एनआयए काही नवीन सुरू झालेलं नाही. पुलवामा घटेनाचा अजुनही रिपोर्ट एनआयए कडून आलेला नाही, का आलेला नाही? कोण होतं त्याच्या मागे? हे सगळे प्रश्न आहेत. मुंबई पोलिसांचं कौतुक संपूर्ण जगामध्ये केलं जातं. एनआयएचा वापर कशासाठी केला गेलेला आहे, या सरकारला महाराष्ट्राला कशाप्रकारे बदनाम केलं जातय, हे महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. त्यामुळे एनआयए आमच्यासाठी काही नवीन विषय नाही. ज्या ठिकाणी भाजपा विरोधातील सरकार असेल, त्या ठिकाणी ईडी, एनआयए हे काही नवीन नाही. ज्याला कर नाही तर त्याला डर कशाला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्यामुळे वाझे असो किंवा कुणी असो कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.” असं देखील पटोले यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“ज्या पद्धतीने महाराष्ट्र व मुंबईच्या पोलिसांना भाजपाच्यावतीने खलनायक करण्याचं काम केलं जात आहे. त्या भाजपाच्या कृतीला काँग्रेसचा विरोध आहे. हे आम्ही विधानसभेतही स्पष्ट केलं व आमच्या हायकमांडचं देखील तेच म्हणणं आहे. पोलिसांना ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, खलनायक केलं जातंय, विरोधी पक्षनेते पोलिसांबद्दल जे काही बोलले त्यावरून त्यांचा सर्वांकडून निषेध झाला. महाराष्ट्र पोलिसांचा अपमान भाजपाकडून केला जातोय, हे काँग्रेस कधीच सहन करणार नाही.” असा इशारा देखील नाना पटोले यांनी यावेळी दिला.