संपूर्ण राज्यात कोविड चाचणीच्या फिरत्या प्रयोगशाळा

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । कोरोनाच्या चाचणीसाठी आगामी काळात संपूर्ण राज्यभरात फिरत्या प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

 

स्पाईस हेल्थ या कंपनीच्या तीन फिरत्या प्रयोगशाळांचे गुरुवारी मुंबईत लोकार्पण झाले. या तीन प्रयोगशाळांच्या मदतीने दररोज अतिरिक्त तीन हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४  तासात मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल, अशी माहिती आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली.

 

 

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हा पुणे आणि मुंबईत कस्तुरबा येथे दोन ठिकाणीच कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यरत होत्या. शासनाने काही दिवसांमध्ये ही संख्या ५०० वर नेली. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानातून कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात आला. संशयितांची तपासणी करतांना सहव्याधीग्रस्तांचा शोध घेण्यात आला. कोरोनावर आता लस उपलब्ध झाली असली तरी विविध देशात कोरोनाचे नवे स्ट्रेन येताना दिसत आहेत. त्यावर संशोधनही सुरु आहे. त्यामुळे आजही कोविड रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याला शासनाचे  प्राधान्य आहे.

 

 

कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. कमी वेळेत त्या चाचणीचा अहवाल मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा नक्की लाभ होईल. मुंबईत या तीन फिरत्या चाचणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेण्याचा मोठा ड्राईव्ह हातात घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Protected Content