जळगाव प्रतिनिधी । २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावाधी येथील संपर्क फाऊंडेशनने घरपोच किराणा आणि औषधी पोहचवण्यासह अन्य मदत पुरविण्याची सेवा जळगावकरांना उपलब्ध करून दिली आहे.
कोरोना व्हायरसची राष्ट्रीय आपत्ती आल्यानंतर सरकार प्रमाणेच समाजसेवी संस्थाही प्रबोधन व सेवा कार्यासाठी तत्पर झालेले आहेत. भारत विकास परिषद अंतर्गत संपर्क फाऊंडेशनच्यावतीने गरजू वयोवृद्ध पेशंटसाठी होम नर्सिंग सुविधा तसेच पेशंटसाठी अटेंडंटची सुविधा देण्यात येत आहे. याचबरोबर आजपासून संचारबंदी आहे तो पर्यंत ज्या लोकांना अत्यावश्यक असलेले औषधी व किराणा ही घरपोच आणून देण्याची व्यवस्था संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यासाठी हेल्पलाईन नंबर ८४३२२७८६२४ या क्रमांकावर आपल्याला आवश्यक असलेली औषधी, किराणा हे सकाळी ९ ते सायं. ५ या दरम्यान नोंद करावयाची आहे. आणि हे सर्व नोंद केलेले सामान दुसर्या दिवशी दुपारी ४ ते सायं. ७ या वेळेत आपणास घरपोच आणून देण्याची व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे. औषधी व किराणा याची होणारी बिलाची रक्कम तेवढी फक्त द्यावयाची आहे, यासाठी कोणताही डिलेव्हरी खर्च अतिरिक्त लागणार नाही.
ही सेवा भारत विकास परिषदेच्या संपर्क फाऊंडेशनच्या माध्यमातून पुरुषोत्तम न्याती, प्रसन्न मांडे, तुषार तोतला, उज्ज्वल चौधरी, उमेश पाटील, चेतन दहाड, राजीव नारखेडे, रवींद्र लढ्ढा, सौ. चेतना नन्नवरे, डॉ. योगेश पाटील, धनंजय खडके, विशाल चोरडीया व प्रशांत महाजन ही प्रोफेशनल व उद्योजक मंडळी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन घरपोच वस्तू पोहोचविण्याची सेवा देणार आहेत. तरी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर नोंदणी करुन जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा. जेणेकरुन गर्दीत जाणे सहज टाळणे शक्य होईल. असे संपर्क फाऊंडेशनच्यावतीने कळविण्यात आलेले आहे.
गोर-गरिबांना नि:शुल्क जेवण
दरम्यान, संचारबंदीच्या काळात दररोज ४०० गोर-गरिब व मजूर व्यक्तींना नि:शुल्क जेवणाचे पाकीट हे या कालावधीत संपर्क फाऊंडेशनच्या वतीने वितरीत केले जाणार आहे. यासाठी वर नमूद केलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.