यावल, प्रतिनिधी । देशात व राज्यात कोरोनाचा प्रादुभाव वाढूनये यासाठी देशभरात संचारबंदी लावण्यात आलेली आहे. याकाळात गोरगरीब उपाशी राहू नये या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत शिधा पत्रिकाधारकांना तीन महिन्यापर्यंत प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज रविवार १९ रोजी करण्यात आला.
यावल शहर तालुक्यात व परिसरात योजना प्रत्यक्षात आजपासून सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानावर सकाळी सात ते दहा व सायंकाळी चार ते रात्री १० पर्यंत धान्य मिळणार आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, पुरवठा विभागाचे सकावत तडवी, राजेंद्र भंगाळे, शेखर तडवी आदींनी केले आहे. आज यावल शहरातील दिलीप नेवे यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११० व १११ वर आज दि. १९ एप्रिल रोजी सकाळी या प्रभागाचे नगरसेवक दिपक रामचंद्र बेहडे, नगरसेविका कल्पना दिलीप वाणी तसेच प्रशासकीय अधिकारी यावलचे तलाठी शरद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान गरीब योजनेचे मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आले. दरम्यान मोफत धान्य वाटप योजनेच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून सकाळच्या सत्रात सुमारे २०० रेशनकार्ड धारकांनी या योजनेचा लाभ घेतला.